धाराशिव (प्रतिनिधी)- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ महाडीबीटी ऑनलाईन प्रणालीद्वारे दिला जातो.राज्य शासनाच्या सुधारित धोरणानुसार आगामी शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून महाडीबीटी प्रणालीचे व्हर्जन 2.0 कार्यान्वित करण्यात येणार असल्याने शैक्षणिक वर्ष 2019-20 ते 2025-26 या कालावधीतील प्रलंबित अर्ज 31 मेपूर्वी पूर्णतः निकाली काढण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अनुसूचित जाती प्रवर्गातील एकूण 402 विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालय व विद्यार्थी स्तरावर प्रलंबित असल्याची माहिती समाज कल्याण विभागाने दिली आहे.

महाडीबीटी प्रणालीद्वारे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती,शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती,राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता आदी योजनांचा लाभ दिला जातो.समाज कल्याण विभागाकडून जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना वेळोवेळी पत्र,वृत्तपत्र जाहिराती तसेच व्हॉट्सॲप समूहांच्या माध्यमातून सूचना देण्यात आल्या होत्या.मात्र,अद्यापही अनेक अर्ज प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे.

प्रलंबित अर्ज वेळेत निकाली न काढल्यास नवीन प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते.त्यामुळे या कामाला “सर्वोच्च प्राथमिकता” देऊन विहित मुदतीत सर्व अर्ज निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान,विहित मुदतीत अर्ज निकाली न काढल्याने अनुसूचित जाती प्रवर्गातील एखादा विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य आणि संबंधित विद्यार्थ्यावर राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.31 मेपर्यंत सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन कवले यांनी केले आहे.

 
Top