कळंब (प्रतिनिधी)-  कळंब तालुक्यातील करंजकल्ला, लोटा पूर्व, लोटा पश्चिम, हिंगणगाव यासह परिसरात दि. 24 व 25 रोजी झालेल्या वादळी वाऱ्याने अक्षरशः थैमान घातले असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. विशेषतः शेतामध्ये उभारण्यात आलेले सौर पंप, विहिरीवरील सौर यंत्रणा तसेच बोअरवरील सौर प्लेट्स वाऱ्याच्या तडाख्याने उद्ध्वस्त झाल्या आहेत.

वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी सौर पॅनेल उखडून फेकले गेले तर काही ठिकाणी लोखंडी स्ट्रक्चर वाकले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. याशिवाय शेतातील कडब्याच्या गंजी, पत्र्याचे गोठे, शेड आणि शेती उपयोगी साहित्य देखील कोसळून मोठी हानी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. वेदांत टेळे, शरद काळे, महादेव पवार, एम. एम. शेख, पांडुरंग पवार, समाधान कदम, विश्वास पवार यांच्यासह असंख्य शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामे करावेत, अशी मागणी जोर धरत आहे.

“शेती वाचवण्यासाठी कर्ज काढून सौर यंत्रणा बसवल्या, पण एका वादळाने सर्व काही उद्ध्वस्त केले. शासनाने तातडीने मदत न दिल्यास शेतकरी पूर्णपणे हवालदिल होईल,” अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.दरम्यान, महसूल व कृषी विभागाने तातडीने संयुक्त पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शेतकरी वर्गातून देण्यात आला आहे.

 
Top