भुम (प्रतिनिधी)-  छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिर आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भूम येथे 8 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात तब्बल 472 नागरिकांनी सहभाग नोंदवला. धाराशिव जिल्हाधिकारी व दोन तहसील कार्यालय उपक्रमांतर्गत विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात विविध दाखले, प्रमाणपत्रे, महसूल, पंचायत, आरोग्य तसेच सामाजिक योजनांबाबत अर्ज स्वीकारण्यात आले.

शिबिरादरम्यान डिजिटल 7/12 उताऱ्यांसाठी सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. डिजिटल 7/12 चे 112 उतारे वितरित करण्यात आले. तसेच 8अ उताऱ्यांचेही 112 उतारे वितरित करण्यात आले. शिबिरात नवीन शिधापत्रिका, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी दाखले, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, अल्पभूधारक प्रमाणपत्र आदींसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल करण्यात आले. महसूल विभागाकडे प्राप्त झालेल्या अर्जामध्ये उत्पन्न प्रमाणपत्रासाठी 72 अर्ज, रहिवासी प्रमाणपत्रासाठी 14 अर्ज, जात प्रमाणपत्रासाठी 5 अर्ज तर नॉन क्रिमिलियरसाठी 6 अर्ज प्राप्त झाले. यापैकी अनेक अर्जावर तत्काळ कार्यवाहीही करण्यात आली. सिंगल विंडो क्लिअरन्स अंतर्गत ई-मोजणीसाठी 2 अर्ज प्राप्त झाले असून 4 प्रकरणांवर कार्यवाही झाली. ऑनलाईन नोंदीसाठी 5 प्रकरणे हाताळण्यात आली.

इतर योजनांमध्ये संजय गांधी योजना, श्रावण बाळ योजना, आयुष्यमान कार्ड, आधार अपडेट, शिधापत्रिका सेवा आदींचाही लाभ नागरिकांनी घेतला. नगराध्यक्षा संयोगिता संजय गाढवे, उपनगराध्यक्ष लक्ष्गी साठे, बाळासाहेच क्षीरसागर, सुरज गाढवे, रिमा शिंदे, अनिल शेंडगे, चंद्रगणी गायकवाड, रुपेश शेंडगे, चंद्रकला पवार, आबासाहेब मस्कर, उपविभागीय अधिकारी संतोष राऊत, तहसीलदार जयवंत पाटील, नायब तहसीलदार प्रविण जाधव, उपअधीक्षक भूमी अभिलेख, ईट मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, कृषि विभाग, आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास योजना विभाग, ग्राम विकास विभागचे कर्मचारी उपस्थित होते.

 
Top