धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम,1961 मध्ये करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण सुधारणांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्ती प्रक्रियेत राजकीय आघाड्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित राजकीय पक्ष, गट आणि अपक्ष सदस्यांना विहित मुदतीत आघाडी नोंदणीचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले आहे.
राज्य शासनाने सन 2026 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 17 दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी राजपत्रात प्रसिद्ध केला आहे.या अधिनियमातील कलम 10-1अ (4) आणि कलम 59अ (4) मधील तरतुदीनुसार, जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करताना मान्यताप्राप्त पक्ष, नोंदणीकृत पक्ष किंवा गटांचे तौलनिक संख्याबळ विचारात घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
नवीन तरतुदीनुसार, निवडणूक निकालांच्या अधिसूचनेच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत मान्यताप्राप्त पक्ष, नोंदणीकृत पक्ष, गट किंवा अपक्ष सदस्यांना आघाडी स्थापन करण्याची मुभा देण्यात आली आहे. अशी आघाडी नोंदणीकृत झाल्यानंतर तिला निवडणूकपूर्व आघाडीप्रमाणेच कायदेशीर मान्यता प्राप्त होणार आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर झाले होते. त्यानंतर निर्वाचित सदस्यांची नावे 11 फेब्रुवारी 2026 रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामुळे अधिसूचनेपासून तीन महिन्यांच्या कालावधीत इच्छुक पक्ष व गटांना आघाडी स्थापन करून त्याची अधिकृत नोंदणी करता येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्ती प्रक्रियेसाठी ज्या राजकीय पक्षांना, गटांना किंवा अपक्ष सदस्यांना आघाडीची नोंदणी करावयाची आहे,त्यांनी आवश्यक कायदेशीर दस्तऐवजांसह आपले प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे नियोजित मुदतीत सादर करावेत.विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या निर्देशानुसार जारी करण्यात आलेल्या या सूचनेमुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील आगामी नामनिर्देशित सदस्य नियुक्ती प्रक्रियेला वेग येणार आहे. धाराशिव जिल्हा परिषदेत पाच स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणार आहे. तर जिल्ह्यातील आठ पंचायत समितीमध्ये 22 स्वीकृत सदस्य नियुक्त करण्यात येणार आहेत
