धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळा अत्यंत जीर्ण व मोडकळीस आलेल्या अवस्थेत असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन तात्काळ दुरुस्ती व आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील अनेक शाळांच्या वर्गखोल्या, छत, भिंती व इतर बांधकामे अत्यंत खराब अवस्थेत आहेत. अनेक ठिकाणी छत गळत असून भिंतींना मोठे तडे गेले आहेत. काही शाळांच्या इमारती कधीही कोसळण्याच्या स्थितीत असल्याने विद्यार्थी जीव मुठीत धरून शिक्षण घेत आहेत. शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत हक्क असून सुरक्षित वातावरणात शिक्षण मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व जीर्ण शाळांची तात्काळ तांत्रिक तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती, पुनर्बांधणी अथवा नवीन इमारती उभारण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.तसेच अतिधोकादायक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पर्यायी सुरक्षित व्यवस्था करावी, दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश द्यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देऊन ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केली आहे.

 
Top