धाराशिव (प्रतिनिधी)-  देशाच्या शेतकऱ्यांना आज उपदेशाची नाही, तर आधाराची गरज आहे. दिल्लीच्या वातानुकूलित खोल्यांमध्ये बसून “रासायनिक खतांचा वापर कमी करा” अशी आवाहने करणे फार सोपे असते; पण उन्हातान्हात राबणाऱ्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याची अवस्था पाहण्याची हिंमत सरकारने दाखवावी. अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे जिल्हा समन्वयक ॲड संजय भोरे यांनी केली आहे.

आज देशाची लोकसंख्या 140 कोटींच्या पुढे गेली आहे. या जनतेला पोटभर अन्न द्यायचे असेल, तर शेती उत्पादन वाढले पाहिजे. हरित क्रांतीपासून आजपर्यंत रासायनिक खतांनी उत्पादन वाढवण्यात मोठी भूमिका बजावली, हे सत्य आहे. मग अचानक “कमी करा” म्हणणाऱ्यांनी आधी सांगावे  पर्याय काय? शेतकऱ्याला हमीभाव नाही, वीज महाग, खते महाग, बियाणे महाग, डिझेल महाग, आणि वरून सरकारचा सल्ला  “रासायनिक खते कमी वापरा”

अहो, फक्त आवाहन करून शेती चालत नाही. शेतकऱ्याच्या घरात घोषणांचे पोते शिजत नाहीत.

दोन हजारांचे हप्ते टाकून शेतकऱ्यांचा “सन्मान” होत नाही. शेतकऱ्याला भीक नको, त्याच्या कष्टाचा योग्य भाव हवा. त्याच्या मालाला हमीभाव द्या. सेंद्रिय शेती करायची असेल तर त्यासाठी बाजारपेठ द्या, अनुदान द्या, प्रशिक्षण द्या, तंत्रज्ञान द्या. अन्यथा ही सगळी आवाहने म्हणजे निव्वळ जाहिरातबाजी ठरेल.

आज परिस्थिती अशी आहे की, शेतकरी राबतो पिकवतो पण नफा दलाल खातो आणि सरकार भाषणे देते. भाषणे नकोत, हमीभाव हवा. घोषणाबाजी नको, ठोस कृती हवी अशी मागणी करण्यात आली आहे. 

 
Top