धाराशिव (प्रतिनिधी)- सशस्त्र सेना ध्वजदिन 2024 निमित्त निधी संकलनात उल्लेखनीय कामगिरी करत धाराशिव जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. या उत्कृष्ट कार्याची दखल घेत पालकमंत्री श्री.प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते 1 मे रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला. 7 डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वजदिन म्हणून पाळण्यात येतो. या निमित्ताने दरवर्षी 7 डिसेंबरपासून पुढील वर्षाच्या नोव्हेंबर अखेरपर्यंत निधी संकलन मोहीम राबविण्यात येते. ध्वजदिन निधी-2024 साठी महाराष्ट्र शासनाकडून धाराशिव जिल्ह्यास 57 लक्ष रुपये इतके उद्दिष्ट देण्यात आले होते.
मात्र जिल्ह्यातील विविध शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच विविध संस्थांच्या सक्रिय सहकार्यामुळे हे उद्दिष्ट केवळ पूर्णच झाले नाही,तर त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक निधी संकलित करण्यात आला. एकूण 1 कोटी 34 हजार 84 हजार रुपये इतका निधी जमा करण्यात आला असून, हे प्रमाण दिलेल्या उद्दिष्टाच्या तब्बल 236.56 टक्के इतके आहे.
या उल्लेखनीय यशामुळे जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. या पार्श्वभूमीवर 1 मे 2026 रोजी झालेल्या कार्यक्रमात संचालक, सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून प्राप्त स्मृतिचिन्ह जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांना प्रदान करण्यात आले. या सन्मानामुळे जिल्ह्यातील सर्व संबंधित विभाग, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव झाला असून, देशसेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या उपक्रमात धाराशिवने उंच भरारी घेतली आहे.
