धाराशिव (प्रतिनिधी)- आरोग्य हीच खरी संपत्ती असून निरोगी समाज घडविणे हीच प्रगतीची खरी दिशा आहे.नव्याने उभारलेल्या आरोग्य संस्थांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळेल,तर ‌‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव‌’ अभियानातून प्रत्येक गाव निरोगी,सक्षम आणि स्वावलंबी करण्याचा संकल्प शासनाने हाती घेतला आहे,असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

आज 1 मे रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आरोग्य संस्थांचे ऑनलाईन लोकार्पण आणि ‌‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव‌’ अभियान कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून पालकमंत्री श्री.सरनाईक बोलत होते.यावेळी मंचावर मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील,आमदार कैलास पाटील घाडगे,आमदार प्रवीण स्वामी,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर,पोलीस अधीक्षक रितू खोखर,जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा उषा गायकवाड,महिला व बाल कल्याण समिती सभापती पूजा शिंदे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

श्री.सरनाईक म्हणाले की,धाराशिव हा मराठवाड्यातील आकांक्षित जिल्हा असून दुष्काळप्रवण परिस्थिती,ग्रामीण लोकसंख्या आणि वाढती आरोग्य गरज लक्षात घेता आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण अत्यंत आवश्यक होते. लोहारा तालुक्यातील माकणी व कानेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांसह विविध आरोग्य उपकेंद्रांचे लोकार्पण ही जिल्ह्यासाठी महत्त्वाची पायरी आहे.या सुविधांमुळे माता-बाल आरोग्य,लसीकरण आणि प्राथमिक उपचार अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचतील. महाराष्ट्र शासनाने 1 एप्रिल 2026 पासून सुरू केलेले ‌‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव‌’ अभियान हे गावागावात स्वच्छ,निरोगी आणि सशक्त समाज घडविण्याचे व्यापक पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.या अभियानांतर्गत क्षयरोग,कुष्ठरोग,हिवताप, डेंग्यू यांसारख्या संसर्गजन्य आजारांवर नियंत्रणासोबतच मधुमेह,उच्च रक्तदाब, कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य आजारांचे लवकर निदान,गर्भवती मातांची काळजी,बालकांचे लसीकरण आणि कुपोषण निर्मूलनावर विशेष भर दिला जाणार आहे.असे सांगितले.

हे अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत,आरोग्य कर्मचारी,स्थानिक स्वराज्य संस्था,स्वयंसेवी संघटना आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक असल्याचे सांगत पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी प्रत्येक गावाने स्पर्धात्मक भावनेने या उपक्रमात सहभागी व्हावे,असे आवाहन केले.उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना राज्य,विभाग आणि जिल्हास्तरावर पुरस्कार दिले जाणार असल्याने गावांच्या सर्वांगीण विकासाला नवी चालना मिळेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“चला,आपण सर्व मिळून ‌‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव‌’ हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवूया आणि धाराशिव जिल्ह्याला निरोगी,सक्षम व आदर्श जिल्हा बनवूया, ”असे आवाहन करत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आरोग्य सुविधांचा प्रभावी वापर करून प्रत्येक नागरिकापर्यंत उत्तम सेवा पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला.

श्रीमती.अर्चना पाटील म्हणाल्या की,या अभियानाची आज सुरुवात होत आहे.दोन प्राथमिक आरोग्य केंद्र व चार उपकेंद्रचे आज लोकार्पण होत आहे.जवळपास 17 कोटी रुपयांची ही कामे आहेत.सर्व गावांनी “माझ गाव आरोग्य संपन्न गाव “ या अभियानात सहभागी व्हावे.धाराशिव हा आरोग्य सेवेत राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.संस्थांतर्गत होणाऱ्या बाळंतपणावर आशाताईंना प्रत्येकी सहाशे रुपये देणारी ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद आहे. त्यामुळे आरोग्य संस्थेत बाळंतपणाचे प्रमाण वाढले आहे.मुलींचा जन्मदर देखील चांगला आहे.जिल्ह्यात आशाताई व आरोग्याच्या योजनांमुळे मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढले आहे.आशाताईंना आणखी सुविधा देऊन आरोग्य सेवा अधिक चांगल्या प्रकारे करता येईल असे त्या म्हणाल्या.

आरोग्य उपसंचालक डॉ.श्रीमती.रेखा गायकवाड यांनी ऑनलाइन सहभागी होऊन मार्गदर्शन केले. माकणी व कानेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतून ऑनलाईन पद्धतीने आयोजित या लोकार्पण सोहळ्याला लोकप्रतिनिधीनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यशाळेचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांनी केले.कार्यशाळेला पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या ऑनलाइन उद्घाटन सोहळ्याला संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातून वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.तर जिल्हा नियोजन समिती सभागृहातून विविध विभागाचे अधिकारी -कर्मचारी आणि आशा सेविका उपस्थित होत्या.

 
Top