भुम (प्रतिनिधी)- भूम शहरात अनाधिकृत पुतळे बसवणे तसेच गोलाई चौकात झेंडा उभारण्याच्या कारणावरून निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीनंतर शहरातील जातीय सलोखा व शांतता अबाधित राखण्यासाठी भूम पोलीस ठाण्यात शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. बैठकीस शहरातील ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, वकील, युवक, पत्रकार तसेच विविध समाजातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांशी संवाद साधत शांतता राखण्याचे आवाहन केले.

यावेळी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांनी सांगितले की, अनधिकृत पुतळे उभारण्यापासून सुरू झालेला वाद गोलाई चौकातील झेंडा प्रकरणामुळे अधिक चिघळला. या घटनेदरम्यान दोन गटांमध्ये दगडफेक होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही बाजूंनी कोणीही माघार घेण्यास तयार नसल्याने पोलिसांना कठोर कारवाई करावी लागली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पोलीस निरीक्षक गणेश कानगुडे यांनीही बैठकीत भूमिका स्पष्ट करत, या प्रकरणात दोन्ही गटांतील प्रमुख जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. समाजातील नागरिकांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या पाठीशी उभे राहू नये, अशा व्यक्तींना योग्य शिक्षा होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, या कारवाईदरम्यान काही विद्यार्थी व निष्पाप नागरिकांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची बाब नागरिकांनी बैठकीत मांडली. संबंधित व्यक्तींचा घटनेशी कोणताही संबंध नसल्यास त्यांच्यावर कारवाई करू नये, अशी मागणी उपस्थितांनी केली. यावर पोलीस प्रशासनाने स्पष्ट आश्वासन देत सांगितले की, चौकशीत निर्दोष आढळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर अन्यायकारक कारवाई केली जाणार नाही. निष्पक्ष चौकशी करूनच पुढील निर्णय घेतला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. बैठकीच्या शेवटी शहरात शांतता व सामाजिक ऐक्य कायम राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कायदा हातात घेण्याचे टाळावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.


 
Top