भुम (प्रतिनिधी)- वारेवडगाव- कासारी-भोगलवाडी-पिंपळपूर ते साकत या रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून रखडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. अपूर्ण अवस्थेत पडून असलेल्या या रस्त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असून शेतकरी, विद्यार्थी, दूध उत्पादक तसेच रुग्णांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत स्वराज्य संघटना, भूम तालुका यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी, भूम यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात संबंधित रस्त्याचे काम तात्काळ सुरू करून पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनानुसार, वारखंडगावकासारीभोगलवाडीपिंपळपूर ते साकत या मार्गावरील रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, काम पूर्ण न करता ते अर्धवट अवस्थेतच सोडण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्याची पूर्णतः दुरवस्था झाली असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. हा मार्ग परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून महामार्ग व मोठ्या बाजारपेठेकडे जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर केला जातो.

रस्त्याची खराब अवस्था असल्याने एस.टी. बससेवाही जवळपास बंद पडली आहे. त्यामुळे नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. दोन चाकी वाहनांच्या अपघातांमध्ये वाढ झाली असून अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यात अडचणी निर्माण झाल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. खराब रस्त्यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

यासंदर्भात संबंधित विभागाकडे अनेक वेळा निवेदने देऊन काम सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचे स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, संबंधित प्रशासनाने या रस्त्याचे काम तातडीने सुरू करून पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा सोमवार दि. 26 मे 2026 रोजी वारखंडगाव ते कासारी रोडवर लाक्षणिक आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनाची प्रत पोलिस निरीक्षक, पोलिस ठाणे भूम यांनाही देण्यात आली आहे.

 
Top