धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील जवळपास दीड लाख नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. 14 लाख 16 हजार 943 मतदार असून,त्यापैकी 12 लाख 23 हजार 902 मतदारांची गणना पूर्ण झाली आहे. सुमारे 1 लाख 94 हजार मतदारांची गणना अद्याप बाकी आहे. 49 हजार 780 मतदारांची नावे दुबार मतदारांमध्ये आढळून आली आहेत. जिल्ह्यातील सुमारे 46 हजार मतदार बाहेरगावी असून 40 हजार मतदार मयत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिली. या मोहिमेत जिल्ह्याने राज्यात सहावा तर मराठवाडा विभागात दुसरा क्रमांक मिळविला आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला सुरुवात झाली असून या प्रक्रियेस सर्व राजकीय पक्षांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले. विशेषतः जास्तीत जास्त मतदान बुथ प्रतिनिधी नेमून मतदारांची नावे वगळली जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी,असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात सभागृहात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत आयोजित विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम बैठकीत पुजार बोलत होते. यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रतिनिधी डॉ.स्मिता शहापूरकर, भारतीय जनता पार्टीचे ॲड. नितीन भोसले, बहुजन समाज पार्टीचे महादेव वाघमारे, प्रवीण जगताप यांच्यासह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिरीष यादव,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे, उपजिल्हाधिकारी प्रवीणकुमार धरमकर (रोहयो) आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुजार म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत 1 हजार 523 मतदान बुथ एजंट नियुक्त केले असून,इतर पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनीही आपल्या स्वाक्षरीने बुथ प्रतिनिधींची नावे तातडीने जिल्हा प्रशासनाकडे पाठवावीत,असे आवाहन पुजार यांनी केले. आदर्श आचारसंहितेचा कुठेही भंग होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले. जिल्ह्यात सध्या 1523 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी कार्यरत असून, त्यापैकी 892 अधिकाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असल्याचे त्यांनी सांगितले. अर्ज क्रमांक 6, 7 आणि 8 भरण्याची प्रक्रिया निरंतर सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
