धाराशिव (प्रतिनिधी)- देशातील विधानसभा निवडणुकींचे निकाल तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आले आहे. यासंदर्भात धाराशिव भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी आणि असम या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेले यश हे विकासाभिमुख धोरणांवरील जनतेच्या विश्वासाचे प्रतीक असल्याचेच नमूद केले आहे. सुशासन, पायाभूत सुविधा विकास, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी संधी आणि शेतकरी हिताच्या योजनांना मतदारांनी दिलेला पाठिंबा या निकालांतून स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी विजय निश्चित केला असून बारामती विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत महायुतीच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सर्वच विक्रम मोडीत काढत 2 लाख 18 हजार 930 मतांच्या विक्रमी फरकाने विजय मिळवला आहे हा पोटनिवडणुकीतील निकाल लोकशाही प्रक्रियेतील जनतेच्या सक्रिय सहभागाचे उदाहरण असल्याचे कुलकर्णी यांनी पत्रकात म्हटले आहे.
देशातील विविध राज्यांतील निकाल आणि महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीतील परिणामामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून धाराशिव जिल्ह्यात संघटनात्मक काम अधिक वेगाने राबविले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच स्थानिक पातळीवर जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
यावेळी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हा प्रभारी डॉ. अर्चनाताई चाकूरकर, शरण पाटील, अनिल काळे, नेताजी पाटील, सतीश दंडनाईक, विक्रमसिंह देशमुख, नितीन भोसले, प्रदीप शिंदे, साहेबराव घुगे, गणेश खरसडे, अस्मिता कांबळे, दिलीप भालेराव, प्रकाश आष्टे, संतोष बोबडे, प्रीती कदम, डॉ. सरोजिनी राऊत, विजय शिंगाडे, सिद्धेश्वर कोरे, यांच्यासह सर्व मंडल अध्यक्ष, सर्व मोर्चा अध्यक्ष, सर्व आघाडी व प्रकोष्ठ चे संयोजक, जिल्हा पदाधिकारी, मंडल पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
