धाराशिव (प्रतिनिधी)-  जिजाऊ चौक ते बोरफळ या राज्य मार्गाच्या रखडलेल्या कामामुळे निष्पाप तरुणाचा बळी गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

धाराशिव शहरातील जिजाऊ चौक ते बोरफळ (राज्य मार्ग क्र. 68) या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे. 5 मे 2026 च्या रात्री सांजा गावाजवळ पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी कोणताही संरक्षण कठडा, दिशादर्शक चिन्ह किंवा रेडियम बसवण्यात आलेले नव्हते. त्यामुळे अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्याने भंडारवाडी येथील ओम दिलीप अंधारे या तरुणाची दुचाकी खड्ड्यात कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वीच याच ठिकाणी स्कॉर्पिओ गाडीचा अपघात होऊन 3-4 जण गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी दोघांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. वारंवार अपघात होऊनही प्रशासनाने कोणतीही सुरक्षात्मक उपाययोजना केलेली नाही.

ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत. एमआयडीसी मार्फत सुरू असलेल्या या कामावर देखरेख ठेवण्यासाठी एकही सरकारी अधिकारी पूर्णवेळ उपस्थित नसतो. संपूर्ण मराठवाड्यासाठी केवळ एक कार्यकारी अभियंता नियुक्त असून, त्यांनी कामाच्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असतानाही ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे आणि निष्काळजीपणामुळे एका तरुणाचा बळी गेल्याने जनक्षोभ उसळला आहे. “संबंधित ठेकेदार आणि ज्या अधिकाऱ्यांवर कामाचा दर्जा राखण्याची व वेळेवर काम पूर्ण करण्याची जबाबदारी आहे, त्यांच्यावर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


 
Top