धाराशिव (प्रतिनिधी)-  सर्व विभागांनी मान्सूनपूर्व तयारीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन सराव आयोजित करावेत. विशेषतः तहसीलदार व नगरपालिकांनी आपल्या कार्यक्षेत्रात आपत्कालीन सराव घेताना संबंधित साहित्याचा प्रत्यक्ष वापर करावा. पाळीव जनावरांचे वेळेवर लसीकरण करण्यात यावे. तसेच गायरान जमिनीवर चारा लागवडीसाठी आवश्यक बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अतिवृष्टीऐवजी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यास शेतकऱ्यांनी कोणती पर्यायी पिके घ्यावीत, याचे नियोजन आतापासूनच करावे. आपत्तीचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व विभागांनी सज्ज राहावे. असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले.

14 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मान्सून 2026 पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर, पोलीस अधीक्षक रितू खोखर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके, जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी यांचेसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तर सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी ऑनलाईन पद्धतीने बैठकीत सहभागी होते.

धोकादायक ठिकाणी अधिकाऱ्यांचे नाव व मोबाईल नंबर लावा

जिल्हाधिकारी पुजार म्हणाले की, तलावांवर संबंधित विभागाचे नाव, अधिकाऱ्याचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक असलेले फलक लावण्यात यावेत. अतिवृष्टीमुळे धोका निर्माण होऊ शकणारे वाकलेले पोल, लोंबकळणाऱ्या तारा व धोकादायक वीज यंत्रणेचे सर्वेक्षण करून दुरुस्तीची कामे तातडीने हाती घ्यावीत.  खोखर यावेळी म्हणाल्या की,प्रत्येकाने आपली जबाबदारी वेळीच पार पाडावी. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण होणार नाही. 

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा,पूर व यात्रांसंदर्भातील एसओपी अद्ययावत करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.तसेच 1077 हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित ठेवण्याबाबतही सूचना देण्यात यावेळी देण्यात आल्या.मान्सून काळात सर्व विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांच्या जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी दक्ष राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.

 
Top