धाराशिव (प्रतिनिधी)-  पोलीस अधीक्षक, धाराशीव श्रीमती रीतु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल मोहिते (परि. पोलीस उपअधीक्षक) यांना प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे परंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या चालविण्यात येत असलेल्या 7 चक्री जुगार अड्ड्यांवर आणि 2 अवैध तीन पत्ती (तिरट) क्लबवर पथके तयार करून दिनांक 21 मे 2026 रोजी छापेमारीची धडक कारवाई करण्यात आली.

सदर कारवाईमध्ये अमोल मोहिते यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक विजय आटोळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण सोमवंशी, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र बहुरे तसेच पोलीस अंमलदार व चालकांनी सहभाग घेतला. उक्त कारवाईदरम्यान एकूण 9 गुन्हे परंडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. 

सदर कारवाईदरम्यान घटनास्थळावरून एकूण 29 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, 1887 चे कलम 4 आणि 5 नुसार गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. आरोपींकडून जुगाराच्या साहित्यासह 4 लाख 93 हजार 33 रूपये रोकड आणि अंदाजे 8 लाख 8 हजार 700 रूपये किमतीचा इतर मुद्देमाल, असा एकूण रु. 13 लाख 1 हजार 733 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाईच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक रीतु खोखर यांनी अवैध व्यवसाय करणाऱ्यांना कठोर इशारा दिला असून, धाराशीव जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरू आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध यापुढेही अशीच कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

 
Top