मुरूम (प्रतिनिधी) - नगर शिक्षण विकास मंडळ संचलित श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. सुधीर पंचगल्ले यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा शुक्रवार (ता. 1) रोजी अत्यंत भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात पार पडला. प्रदीर्घ शैक्षणिक योगदानाबद्दल संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी राज्यमंत्री तथा भाजपा लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील म्हणाले की, प्राध्यापक हा केवळ तासिका घेणारा कर्मचारी नसून तो पिढ्या घडवणारा खरा शिल्पकार असतो. डॉ. पंचगल्ले यांनी आपल्या सेवाकाळात पुस्तकी ज्ञानासोबतच हजारो विद्यार्थ्यांना जगण्याची दिशा दिली. निवृत्ती ही केवळ सेवापुस्तकातील असते, कर्तव्यातील नसते. कर्तव्यातून निवृत्ती कधीच नसते. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग समाजाला यापुढेही होत राहील याची खात्री आहे. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, सहाय्यक शिक्षण संचालक संजय पंचगल्ले, सत्यसाई पब्लिक स्कूलचे (भालकी) अध्यक्ष चंद्रशेखर यम्मे, प्रादेशिक व्यवस्थापक शिवाजी शिंदे (पानिपत), धनराज मंगरुळे, डॉ. सतीश शेळके, सूर्यकांत जाधव, गणेश अंबर, उल्हास घुरघुरे यांची उपस्थिती होती.

 बसवराज पाटील व बापूराव पाटील यांच्या हस्ते डॉ. सुधीर पंचगल्ले व त्यांच्या सुविद्य पत्नी विजयाताई यांचा शाल, सन्मानचिन्ह, बुके आणि मानपत्र देऊन यथोचित गौरव करण्यात आला. आपल्या सत्काराला उत्तर देताना डॉ. पंचगल्ले भावूक झाले होते. या महाविद्यालयाने मला ओळख दिली आणि इथल्या विद्यार्थ्यांनी मला सदैव कार्य करण्याची ऊर्जा दिली, अशा शब्दांत त्यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी संजय पंचगल्ले, प्रा. विजया बेलकेरी, डॉ. राम बजगिरे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक हाळे, संजय गोणगे, अशोक बेलकेरी, मनोज पंचगल्ले, अरुण राजेश्वरे, अनिकेत पंचगल्ले, शिवराज पंचगल्ले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले यांनी तर आभार डॉ. प्रतापसिंग राजपूत यांनी केले. या सोहळ्याला महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, माजी विद्यार्थी आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.


 
Top