धाराशिव (प्रतिनिधी)- आजच्या भावनाशून्य आणि यांत्रिक युगात माणसाला माणुसकीशी जोडण्याचे मोठे काम 'आवर्तनाच्या आत बाहेर' या काव्यसंग्रहाने केले आहे. या संग्रहातील कवितांमध्ये ग्रामीण जीवनाचे वास्तव, प्रबोधन आणि वाचकाला अंतर्मुख करायला लावणारी कमालीची संवेदनशीलता आहे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख व सुप्रसिद्ध कवी डॉ. पी. विठ्ठल यांनी केले.
मराठवाडा साहित्य परिषद शाखा धाराशिवच्या वतीने कवी शाम नवले यांच्या 'आवर्तनाच्या आत बाहेर' या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा सोमवार, 25 मे रोजी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य भालचंद्र हुच्चे होते. सुरुवातीला महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेच्या माजी प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार यांनी या संग्रहाचे कौतुक करताना सांगितले की, हा कवितासंग्रह वर्तमान काळाचे चिंतन करायला लावणारा आणि सामाजिक भान जपणारा आहे. कवीच्या अंतकरणातून आणि थेट अनुभवातून हे उत्स्फूर्त शब्द बाहेर पडले आहेत. अत्यंत उत्कृष्ट अशा या संग्रहातून वाचकांमध्ये आशावादी आणि सजग जाणिवा निर्माण होतील असेही त्यांनी नमूद केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य भालचंद्र हुच्चे यांनी संस्कारांमुळेच संस्कृती टिकून राहते, असे सांगत पर्यावरणाचे महत्त्व विशद केले. संस्कृती प्रकाशन (पुणे) च्या माध्यमातून हा काव्यसंग्रह वाचकांच्या भेटीस आला आहे. या दिमाखदार सोहळ्याला व्यासपीठावर एम. डी. देशमुख (ज्येष्ठ शिक्षणतज्ञ), नानासाहेब पाटील (माजी नगराध्यक्ष), रवींद्र खंदारे (प्राथमिक शिक्षणाधिकारी), प्रा. डॉ. महेंद्र चंदनशिवे, हनुमान ढाकणे (जिल्हा ग्रंथालय अधिकारी), कवी शाम नवले व त्यांचे कुटुंबीय (आई-वडील आणि पत्नी) आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. रवी केसकर यांनी प्रास्ताविक केले, तर प्रा. डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन केले. या सोहळ्याला धाराशिवमधील साहित्यिक, रसिक वाचक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी हणमंत पडवळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.
