धाराशिव (प्रतिनिधी)- माथाडी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्या व न्याय्य हक्कांसाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाला आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी भेट देत आंदोलक कामगारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कामगारांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा देत त्यांच्या हक्कांसाठीच्या प्रत्येक लढ्यात कायम सोबत राहण्याची ग्वाही दिली.
आंदोलनस्थळी उपस्थित माथाडी कामगारांच्या समस्या, अडचणी आणि विविध मागण्यांविषयी डॉ. पाटील यांनी सविस्तर माहिती घेतली. कामगारांना न्याय मिळावा आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, यासाठी शासन व प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना डॉ. प्रतापसिंह पाटील म्हणाले की, “माथाडी कामगार हे समाजातील कष्टकरी घटक असून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठीचा संघर्ष महत्त्वाचा आहे. कामगारांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन त्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा.”
या भेटीदरम्यान नगरसेवक सुनील आंबेकर, नगरसेवक पंकज भोसले, नगरसेवक सर्फराज कुरेशी, नगरसेवक अशोक देवकते, युवक प्रदेश सरचिटणीस इंजिनिअर रामेश्वर पवार, जिल्हा संघटक अमोल सुरवसे, शहर कार्याध्यक्ष नरसिंह मिटकरी, ॲड. योगेश सोन्नेपाटील, शुभम सुकाळे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
