तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे कुलस्वामिनी   श्री तुळजाभवानी  मातेचे भक्त सर्व जाती-धर्माचे असून कष्टकरी जातीचे भक्त मोठ्या संख्येने आहेत.     श्री तुळजाभवानी मंदिरात शुक्रवारी पारधी समाज बांधवांनी  येवुन मोठ्या भक्तिभावाने कुलधर्म व कुलाचार केला. हजारो पारधी समाज बांधन  भाविकांनी सहकुटुंब तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी उपस्थित राहत मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.

पारधी समाजातील महिला, पुरुष, लहान मुले नव्या पारंपरिक वेशभूषेत तुळजापूरमध्ये दाखल झाले होते. हा समाज समूहाने देवधर्म कुलधर्म कुलाचार करतो  हलग्यांच्या ठेक्यावर नृत्य करत, परिसर दणाणून गेला होता. मंदिर परिसरात सर्वत्र हलग्यांचा कडकडाट घुमत असल्याने धार्मिक उत्साहाचे अनोखे चित्र पाहायला मिळाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही पारधी समाज बांधवांनी श्री तुळजाभवानी मातेचा कुलधर्म-कुलाचार मोठ्या श्रद्धेने पार पाडला. देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. कुलाचार पूर्ण झाल्यानंतर भाविकांनी देवीचे आशीर्वाद घेत समाधान व्यक्त केले. यावेळी अनेक कुटुंबांनी एकमेकांना कुंकू लावत आनंद साजरा केला. पारधी समाजातील वयोवृद्धांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांनी या धार्मिक परंपरेत उत्साहाने सहभाग घेतला. गावोगावच्या वस्त्यांमधून भाविक तुळजापूरमध्ये दाखल झाल्याने शहरात दिवसभर मोठी गर्दी पाहायला मिळाली.

दरम्यान, भाविकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे तुळजापूरमधील बाजारपेठेतही मोठी उलाढाल झाली. कपडे, पूजासाहित्य, प्रसाद व इतर वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. धार्मिक परंपरा, भक्तीभाव आणि सांस्कृतिक उत्साह यांचा संगम अनुभवण्यासाठी तुळजापूर नगरी पुन्हा एकदा भक्तिरसात न्हाऊन निघाल्याचे चित्र पाहायला मिळाले.


 
Top