कळंब (प्रतिनिधी)- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 9 मे  रोजी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, कळंब येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये एकूण 681 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून तब्बल 1,16,74,746 रुपयांची तडजोड व वसुली करण्यात आल्याची माहिती तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश-1 कळंब आर. के. राजेभोसले यांनी दिली.

या राष्ट्रीय लोकअदालतीसाठी एकूण पाच पॅनल तयार करण्यात आले होते. पॅनल क्रमांक 1 चे प्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश-1 श्री. आर. के. राजेभोसले यांनी तर पंच म्हणून ॲड. व्ही. पी. थोरात यांनी काम पाहिले. पॅनल क्रमांक 2 साठी न्यायाधिश  पी. आर. कुलकर्णी व ॲड. ए. के. शेख, पॅनल क्रमांक 3 साठी न्यायाधिश. के. के. चौधरी व ॲड. व्ही. बी. दुगाने, पॅनल क्रमांक 4 साठी न्यायाधिश  एन. एम. रेड्डी व ॲड. एल. जे. ओव्हाळ, तर पॅनल क्रमांक 5 साठी न्यायाधिश ए. डी. जाधव व ॲड. के. व्ही. गालफाडे यांनी कामकाज पाहिले.

लोकअदालतीत ठेवण्यात आलेल्या 114 दिवाणी प्रकरणांपैकी 25 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. यामध्ये दोन मोटार वाहन अपघात प्रकरणांमध्ये 23 लाख 50 हजार रुपयांची तडजोड करण्यात आली. तसेच रक्कम वसुलीच्या 10 दरखास्तींमधून 74 लाख 97 हजार 348 रुपयांची वसुली करण्यात आली. याशिवाय दिवाणी स्वरूपाची 13 प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. फौजदारी स्वरूपाच्या 114 प्रकरणांपैकी गुन्हा कबुलीच्या 55 प्रकरणांमध्ये सुनावणी झाली. त्यापैकी 18 प्रकरणांमध्ये 9 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

लोकअदालतीदरम्यान विविध बँका, ग्रामपंचायती, नगर परिषद, पतसंस्था आदींकडून एकूण 1599 दाखलपूर्व (प्री-लिटिगेशन) प्रकरणे सादर करण्यात आली होती. त्यामध्ये बँकेच्या प्रकरणांमधून 2 लाख 96 हजार रुपयांची वसुली झाली. नगर परिषद कळंब यांच्या 25 प्रकरणांमधून 2 लाख 78 हजार 672 रुपये वसूल करण्यात आले. तर कळंब तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या 612 प्रकरणांमधून 12 लाख 43 हजार 226 रुपयांची वसुली लोकअदालतीच्या माध्यमातून करण्यात आली. राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी न्यायालयीन कर्मचारी तसेच पोलिस प्रशासनाने विशेष परिश्रम घेतले.

 
Top