धाराशिव (प्रतिनिधी)- सन 2025-26 मधील खरीप व रब्बी हंगामासाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात आलेल्या सुमारे 22 कोटी रुपयांच्या कृषी किट वाटप योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार व आर्थिक अपहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी व संबंधित कंत्राटदारांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी केली आहे.
यासंदर्भात मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना सविस्तर निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे, खते, कीटकनाशके आणि सुरक्षा साहित्याचे किट वाटप करण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात अनेक पात्र व गरीब शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालाच नाही.
काही गावांमध्ये केवळ नावापुरते साहित्य वाटप करण्यात आल्याचा आरोप असून अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे साहित्य देण्यात आल्याचेही समोर आले आहे. प्रत्येक गावात प्रत्यक्ष लाभार्थी पडताळणी करण्यात यावी, दोषींना निलंबित करून त्यांच्यावर तात्काळ दाखल करावी आणि अपहाराची रक्कम व्याजासह वसूल करावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. दरम्यान, पुढील सात दिवसांत प्रशासनाने कारवाई न केल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)च्या वतीने जिल्हाव्यापी ठिय्या आंदोलन तसेच कृषी कार्यालय कुलूपबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही राजाभाऊ राऊत यांनी दिला आहे.