भूम (प्रतिनिधी)-  महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयाच्या वतीने तसेच भूम नगरपरिषदेच्या सहकार्याने ‌‘जागर महाराष्ट्राचा' उपक्रमांतर्गत भूम शहरात अमृत 2.0 योजनेची लोककलेच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात आली. शहरातील विविध चौकांमध्ये कलावंतांनी सादर केलेल्या लोककला कार्यक्रमांमधून नागरिकांना योजनेचे महत्त्व पटवून देण्यात आले.

या जनजागृती अभियानाचे उद्घाटन नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका रिमा शिंदे व भाग्यश्री माने यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान अमृत 2.0 योजनेअंतर्गत शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी शासन करत असलेल्या प्रयत्नांची माहिती नागरिकांना देण्यात आली. मुक्ताई कला मंच तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाचे आजी-माजी विद्यार्थी, प्रा. रुपेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखालील कलावंतांनी विविध लोकनाट्य, गीत व प्रबोधनात्मक सादरीकरणातून अमृत 2.0 योजनेचे फायदे नागरिकांपर्यंत पोहोचवले. घराघरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचविणे, पाणीपुरवठा व्यवस्थेचे सक्षमीकरण, जलसंधारण आणि नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनासाठी या योजनेचे असलेले महत्त्व प्रभावीपणे मांडण्यात आले.

शहरातील विविध भागांत झालेल्या या कार्यक्रमांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लोककलेच्या माध्यमातून शासनाच्या योजनांची माहिती दिल्यास ती अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचते, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी मुशीर शेख, आक्तर जमादार, सुनील शेटे, रवींद्र भोसले, प्रकाश गाढवे, तुकाराम माळी, कुणाल गायकवाड, प्रवीण गाडे, आजिनाथ गिते, सुमित जाधव, सुदर्शन उंदरे, विशाल शिंदे, ऋषिकेश तट, धीरज कांबळे यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top