मुरूम (प्रतिनिधी)- येथील श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचा 17 वा वर्धापन दिन मंगळवारी (ता. 12) बसव सहकार भवन येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. वर्धापन दिनाचे औचित्य साधून उमरगा तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकीत नवनिर्वाचित ठरलेल्या मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला. लोकसेवेच्या कार्यात या लोकप्रतिनिधींनी मोलाचे योगदान द्यावे, अशी भावना रवींद्र गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केली. केवळ राजकीयच नव्हे, तर शैक्षणिक क्षेत्रात दैदिप्यमान यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचाही संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. यामध्ये सुषमा देसाई, मनोज गायकवाड, तुकाराम बोडले, अनिल गुरव, समीक्षा शिंदे, रोहिणी रामपुरे, अनिरुद्ध दूरकर आणि सुषमा चव्हाण या गुणवंतांचा समावेश होता. रक्तदान शिबिर
माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक उत्तरदायित्व जपत अनेक तरुणांनी व नागरिकांनी या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना पतसंस्थेचे अध्यक्ष शिवशरण वरनाळे म्हणाले की, गेल्या 17 वर्षांपासून सभासदांनी जो विश्वास संस्थेवर दाखवला आहे, त्याच बळावर आज संस्था प्रगतीपथावर आहे. आगामी काळात सर्वांच्या सहकार्याने ही संस्था अधिक सक्षमपणे ग्राहकांच्या सेवेत कार्यरत राहील. माजी प्राचार्य दत्तात्रय इंगळे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. या सोहळ्याला जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष सौ. उषाताई रवींद्र गायकवाड, उमरगा पंचायत समितीच्या सभापती ॲड. आकांक्षा चौगुले, नगराध्यक्ष किरण रवींद्र गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब पाटील, माजी नगरसेवक चंद्रशेखर मुदकण्णा, भीमराव वरनाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष शरणाप्पा मुदकण्णा, सचिव कमलाकर जाधव, संचालक वंदना सोनवणे, संगीता जाधव, शिवराज समन, आनंत हिरमुखे, बाबासाहेब पाटील, इंद्रजित लोखंडे, अमृत वरनाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज बोंदर यांनी केले, सूत्रसंचालन किरण गायकवाड यांनी तर आभार मनीष मुदकण्णा यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाखाधिकारी दत्तात्रय कांबळे, चिदानंद स्वामी, प्रशांत काशेट्टी, सचिन कंटेकुरे, धीरज मुदकण्णा, नेहा शेवाळकर, खंडेराव गुरव, संतोष मुदकण्णा व महंतय्या स्वामी आदींनी परिश्रम घेतले. या दर्जेदार आयोजनाबद्दल पतसंस्थेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
