धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-UG - 2026) दि.3 मे 2026 रोजी दुपारी 2 ते 5 (दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दुपारी 2 ते सायंकाळी 6) या कालावधीत धाराशिव जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली असून परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत.परीक्षेची पारदर्शकता, शांतता आणि सुरळीतता अबाधित राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये सर्व परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील पाच परीक्षा केंद्रांवर एकूण 1,902 परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. यात शासकीय तंत्रनिकेतन,तुळजापूर रोड, धाराशिव येथे 240,छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, धाराशिव येथे 222, जिल्हा परिषद कन्या प्रशाला,शहर पोलीस स्टेशनसमोर धाराशिव येथे 240,श्रीपतराव भोसले हायस्कूल,तांबरी विभाग,धाराशिव येथे 720 आणि रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, आकाशवाणीजवळ,बार्शी रोड,धाराशिव येथे 480 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
अपर जिल्हादंडाधिकारी,धाराशिव यांनी जारी केलेल्या आदेशानुसार परीक्षा केंद्रांच्या परिसरात बाह्य उपद्रव रोखण्यासाठी आणि परीक्षार्थींना कोणताही अडथळा होऊ नये यासाठी विविध निर्बंध लागू राहणार आहेत.परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर,पानपट्टी,टायपिंग सेंटर,एसटीडी बूथ,कॉम्प्युटर सेंटर,इंटरनेट कॅफे आदी सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत.
तसेच मोबाईल फोन,सेल्युलर फोन, फॅक्स,ईमेल,कॅलक्युलेटर किंवा इतर कोणतीही प्रसार माध्यमे परीक्षा केंद्र परिसरात नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.कोणत्याही प्रकारच्या घोषणा,गोंधळ,शांततेस बाधा पोहोचविणारे कृत्य,तसेच परीक्षा प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या हालचालींवर बंदी असेल.
परीक्षा केंद्र परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली असून परीक्षेशी संबंध नसलेल्या कोणत्याही व्यक्तीस,अगदी परीक्षार्थ्यांच्या नातेवाईकांनाही प्रवेश दिला जाणार नाही.केवळ परीक्षा केंद्रावर नियुक्त अधिकारी,कर्मचारी,संबंधित शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक,कर्मचारी आणि परीक्षार्थी यांनाच प्रवेश असेल.
याशिवाय परीक्षा केंद्रांवर कोणत्याही वाहनांच्या प्रवेशावरही निर्बंध असतील.हे आदेश 3 मे 2026 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 7 या कालावधीत लागू राहणार आहेत.प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 223 अंतर्गत गुन्हा नोंदवून फौजदारी कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यातील परीक्षा प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकतेने पार पडावी यासाठी सर्व संबंधितांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.