परंडा (प्रतिनिधी)- शहरातील पत्रकाराला फोनवर अरेरावी करत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर नगरपरिषद कर्मचारी जगदीश सोंडगे यांच्यावर कठोर कारवाई करून तात्काळ निलंबन करावे, अशी जोरदार मागणी परंडा तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने करण्यात आली आहे.
मंगळवार (दि.28) रोजी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की मंगळवार पेठेतील मुजावर गल्ली परिसरात मागील दोन-तीन दिवसांपासून कचरा उचलण्यासाठी घंटागाडी आली नव्हती. याबाबत पत्रकार निसार मुजावर यांनी नगरपरिषदेचे कर्मचारी जगदीश सोंडगे यांच्याशी फोनवर संपर्क साधून विचारणा केली असता, सोंडगे यांनी अरेरावी करत जातीवाचक शिवीगाळ केली.
नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याऐवजी अशा प्रकारे गैरवर्तन करणे अत्यंत निषेधार्ह असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद असणे गरजेचे असताना शिवीगाळ करण्यात आली. या घटनेचा पत्रकारांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून, संबंधित कर्मचारी जगदीश सोंडगे यांना तात्काळ निलंबित करून कठोर कारवाई करून निलंबीत करावे. अशी मागणी करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनावर पत्रकार आनंद खर्डेकर, सुरेश घाडगे, प्रमोद वेदपाठक, अविनाश इटकर, विजय माने, मुजीब काजी, आशुतोष बनसोडे, प्रशांत मिश्रा, भजनदास गुडे, तुकाराम गंगावणे, आप्पासाहेब शिंदे, गणेश राशिनकर, सुहास मस्के, सचिन कुलकर्णी, विनय कुलकर्णी, शहाजी कोकाटे, निसार मुजावर, विजय मेहेर, गोरख देशमाने, सदाशिव डाके, फारुक शेख, तानाजी घोडके, सुरेश बागडे, राहुल अर्जुन बनसोडे, रावसाहेब गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, परंडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांना पाठविण्यात आल्या आहेत. कारवाई चा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालया कडे पाठवणार असल्याचे यावेळी तहसिलदार निलेश काकडे यांनी सांगीतले.
