धाराशिव (प्रतिनिधी)- कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत धाराशिव जिल्ह्यासाठी उपसा सिंचन योजना क्र. 2 द्वारे तुळजापूर लोहारा व उमरगा तालुक्यातील 10862 हेक्टर सिंचनासाठी 2.24 अ. घ. फु. पाणी वापर होणार असून सीना नदीवरील घाटणे बॅरेज येथून 6 टप्प्याद्वारे पाणी उपसा करून बांधकाम पूर्ण झालेल्या पाटबंधारे प्रकल्पामध्ये सदरचे पाणी सिंचनासाठी व पिण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजित आहे.

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर,लोहारा व उमरगा या तालुक्यासाठी नियोजित उपसा सिंचन योजना क्र. 2 मधील टप्पा क्रमांक 1 ते 5 ची कामे अंतिम टप्प्यामध्ये आलेले असून पावसाळ्यामध्ये दुष्काळी भागासाठी वरदान ठरणारी योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. सदर योजनेद्वारे सीना नदीवरील घाटणे बॅरेज येथून टप्पा निहाय पाणी उपसा करून तुळजापूर तालुक्यातील रामदारा तलावामध्ये पाणीसाठा करण्यात येणार आहे.

थेट खरेदीद्वारे भूसंपादनास असलेला तीव्र विरोध त्या अनुषंगाने उच्च न्यायालयामध्ये दाखल याचिका भूसंपादन मोबदला मान्य नसल्याने संपादन प्रक्रिया पूर्ण करून ही शेतकऱ्यांचा काम करण्यास असलेला विरोध ज्या गटामधून खोदकाम करावयाचे आहे. त्या गटामधील शेतकऱ्यांचा आप आपसामधील भांडणे इत्यादी कारणामुळे योजनेची कामे वेळेमध्ये पूर्ण करण्यास अडथळे येत आहेत.


 टप्पा क्र. 1 ते 5 च्या बांधकाम सध्यस्थितीबाबत

 कृष्णा मराठवाडा योजनेमधील उपसा सिंचन योजना क्र.2 मधील टप्पा क्र. 1 ते 5 मधील टप्पा क्र. 2 (पडसाळी), टप्पा क्र. 3 (सावरगाव), टप्पा क्र. 5 (सिंदफळ) इत्यादी ठिकाणची स्थापत्य विद्युत व यांत्रिकी कामे 100 टक्के पूर्ण झालेले असून, टप्पा क्र. 4 (पांगरदरवाडी) या ठिकाणचे काम 90 टक्के पूर्ण झालेले आहे.

सन 2025 मधील माहे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना नदीला आलेल्या पुरामुळे योजनेचा सर्वात महत्त्वाचा टप्पा क्र.1 भोयरे येथील पंपग्रहामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाळ साठला होता. त्यामुळे सदर ठिकाणी संत गतीने काम करावे लागले परंतु सध्यस्थितीचा भोयरे पंपग्रहाचे काम 75 टक्के पूर्ण झालेले असून पावसाळ्यापूर्वी सदरचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

कालव्याच्या एकूण 40.96 की मी लांबी मधील फक्त 550 मीटर लांबीचे काम बाकी असून, उर्ध्वगामी  नलिकेच्या एकूण 15.30 की मी लांबी मधील फक्त 700 मी. लांबीचे काम बाकी आहे.

 
Top