धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात वेळोवेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.याअनुषंगानें तातडीने पंचनामे करण्यासाठी प्रशासनाला वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. प्रशासनाने याचे पंचनामे पूर्ण करून प्राथमिक अहवाल शासनाकडे पाठवले आहेत. मात्र, आंब्याच्या मोहोराची मोठी गळ झाल्याने त्याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांची मदत घेऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याला अनुसरून पंचनामे केले जात आहेत व त्याचप्रमाणें लवकरच 33% नुकसान झालेल्या इतर फळपिकांचेही स्वतंत्र पंचनामे केले जातील. अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. नुकसानीबाबत शेतकऱ्यांना काही अडचणी असल्यास त्यांनी तातडीने संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात झालेल्या गारपिटीनंतर तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पंचनामे करण्याचे काम सुरू देखील झले आहे व प्राथमिक अहवालही सादर झाले आहेत. मात्र, आंबा पिकाच्या बाबतीत केवळ बाह्य नुकसान न पाहता, मोठ्या प्रमाणात झालेली मोहोराची गळ विचारात घेणे आवश्यक होते. ही बाब गांभीर्याने घेत छत्रपती संभाजीनगर येथील फळरोपवाटिका संशोधन केंद्राच्या प्रमुख शास्त्रज्ञांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांसह धाराशिव, तुळजापूर, कळंब आणि वाशी या तालुक्यांतील बागांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली आहे. या शास्त्रज्ञांच्या अहवालानुसार आता आंबा पिकाच्या नुकसानीचे स्वतंत्र पंचनामे करण्याचे आदेश आपण प्रशासनाला दिले आहेत. आंब्याप्रमाणेच जिल्ह्यातील इतर फळपिकांचेही गारपिटीमुळे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांना उर्वरित फळबागांची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत.
