भूम (प्रतिनिधी)-  जागतिक पशुवैद्यक दिनानिमित्त ज्येष्ठ पशुवैद्यकीय प्रतिष्ठान सोलापूर यांच्यावतीने डॉ. दिपक औताडे यांना उत्कृष्ट पशुवैद्यक पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.

गोरमाळा ता. भूम  येथील राहिवासी डॉ. दिपक औताडे हे सध्या पुणे येथील कुकुट पालन प्रशिक्षण केंद्र व मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र खडकी या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत असून, जागतिक पशुवैद्यक दिनाचे औचित्य साधत डॉ. औताडे यांना सन्मानित करण्यात आले. त्यांनी विविध प्राण्यांवर 2000 लहान मोठ्या यशस्वी शस्त्रक्रिया केलेल्या असून आज पर्यंत 12000 हजार कृत्रिम रेतन व त्या संदर्भातील अनुषंगिक कामे यशस्वीरित्या केलेली आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे विभागाचे विभागीय सहआयुक्त डॉ. समीर बोरकर यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संतोष पाचपोर, डॉ. अंकुश परिहार यांचेसह पशुवैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमानिमित्त आयोजित तांत्रिक परिसंवादात अँटी मायक्रोबियल रेसिस्टन्स आणि त्यावरील उपाययोजना तसेच पशुवैद्यकातील आव्हाने या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. एन. व्ही. दक्षिणकर व प्रा. डॉ. नितीन मार्कंडे यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी उत्कृष्ट कार्याबद्दल पशुवैद्यकीय क्षेत्रातील काही निवडक डॉक्टरांचा विशेष सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट पशुवैद्यक पुरस्कार डॉ. दीपक औताडे, डॉ. स्नेहल बोधनकर, डॉ. राहुल धडस, डॉ. कुणाल कांबळे व डॉ. प्रसाद भामरे यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले.  कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक डॉ विश्वासराव मोरे, अध्यक्ष, ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठान, सोलापूरचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. पशुवैद्यकीय क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान, अनुभवांची देवाणघेवाण आणि सन्मान सोहळा यामुळे कार्यक्रम संस्मरणीय ठरला.

 
Top