धाराशिव (प्रतिनिधी)- निरोगी समाज घडविण्यासाठी प्रत्येक घटकाने एकत्रितपणे प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. आधुनिक विज्ञानाच्या साहाय्याने आरोग्य सेवा अधिक प्रभावी करता येतात. स्वच्छता,संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यांचा अंगीकार करणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदळकर यांनी केले.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा परिषद धाराशिव येथे कार्यकारी समितीची बैठक घेऊन जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा सर्वांगीण आढावा घेण्यात आला. या बैठकीत आरोग्यविषयक विविध उपक्रम राबवून दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती.प्रियंवदा महाडदळकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभागृहात ही बैठक पार पडली. 7 एप्रिल 1948 रोजी स्थापन झालेल्या जागतिक आरोग्य संघटना च्या स्थापनेनिमित्त दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त यंदा “एकत्रित प्रयत्न आरोग्यासाठी,विज्ञानाची साथ भविष्यासाठी” या घोषवाक्यानुसार जिल्ह्यातील विविध आरोग्य योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करणे,नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती वाढविणे तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष भर देण्यात आला.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिष हरिदास यांनी “माझे गाव आरोग्य संपन्न गाव” या संकल्पनेवर आधारित विविध आरोग्य व जनजागृती उपक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीस संबंधित विभागांचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
