धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव एसटी आगारातील चालक-वाहकांच्या दैनंदिन ड्युटी बुकिंग प्रक्रियेत गंभीर अनियमितता उघडकीस आली असून, वरिष्ठ विभागीय कार्यालयाच्या स्पष्ट आदेशानंतरही नियमांचे उल्लंघन होत असल्याचा धक्कादायक आरोप कर्मचारी वर्गातून होत आहे. विभाग नियंत्रकांनी लेखी सूचना देऊन चौकशी व कारवाईचे आदेश दिले असतानाही प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल दिसून येत नसल्याचेही सांगितले जात आहे.
परिवहन विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नियमानुसार पुढील दिवसाचे ड्युटी बुकिंग आदल्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे. मात्र धाराशिव एसटी डेपोमध्ये हे बुकिंग नियमितपणे रात्री 9 नंतर उशिरा करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चालक व वाहकांना अनिश्चिततेचा सामना करावा लागत असून त्यांच्या दैनंदिन कामकाजावर तसेच वैयक्तिक आयुष्यावरही विपरीत परिणाम होत आहे. विशेष म्हणजे आगारात पुरेशा प्रमाणात वाहतूक निरीक्षक व नियंत्रक उपलब्ध असतानाही ही परिस्थिती कायम असल्याने परिवहन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
