वाशी (प्रतिनिधी)- वाशी शहरातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बसस्थानकातील समस्या तातडीने सोडविण्याची मागणी करत बस स्थानक व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, वाशी बसस्थानक परिसरात स्वच्छतेचा अभाव असून बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे व धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात झाडाझुडपे वाढल्याने प्रवाशांना गैरसोय होत आहे. तसेच बसस्थानकात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिक, ज्येष्ठ प्रवासी तसेच शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. बसस्थानक शहरापासून काही अंतरावर असल्याने येथे येणाऱ्या प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. विशेषतः दुपारच्या वेळेत प्रवाशांना सावली व विश्रांतीची सुविधा नसल्याने अडचणी वाढत असल्याचेही निवेदनात सांगण्यात आले आहे.

धाराशिव जिल्हा हा राज्याचे परिवहन मंत्री यांच्या पालकमंत्रिपदाचा जिल्हा असतानाही बसस्थानकाची अशी दुरवस्था असणे ही गंभीर बाब असल्याचे मनसेने नमूद करत संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन आवश्यक दुरुस्ती व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट, शब्बीर शेख, अक्षय चेडे, सलीम औटी, बाळासाहेब भुईंगळ, विष्णू पाटील, अजय सोनटक्के, किशोर गायकवाड यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.


 
Top