धाराशिव (प्रतिनिधी)- शिवसेनेचे युवा जिल्हा प्रमुख आनंद पाटील यांनी लोहारा तालुक्यातील भातागळी येथे शिवसेना पक्ष नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे आणि पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली “एकनाथ केसरी” बैलगाडा शर्यत यशस्वी पार पाडली. या माध्यमातून आनंद पाटील यांच्या मातोश्रींना जिल्हा परिषद सभापतीपदासाठी डावलणाऱ्या माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांना अंतर देऊन विशेष म्हणजे भाजपाचे युवा नेते शरण पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या शर्यतीमुळे उमरगा व लोहारा तालुक्यात महायुती मजबूत असल्याचे दाखवून देत आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली आहे. त्यामुळे या भागात पुन्हा आनंद पाटलांच्या नावाची राजकीय पटलावर नव्याने चर्चा सुरु झाली आहे. निमित्त बैलगाडा शर्यतीचे असले तरी बैलगाडा आखाड्याच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने राजकीय वचपा काढण्याचा खरखुरा सत्तेच्या खुर्चीचा आखाडा पेटला असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत प्रथम येण्याचा मान भातागळी येथील आनंद पाटलाच्या दमदार बैलाने पटकावला आहे.

लोहारा तालुक्यातील भातागळी येथे श्री शंभो महादेव यात्रेनिमित्त शिवसेनेचे आनंद पाटील यांनी “एकनाथ केसरी बैलगाडा शर्यत“ दि.7 एप्रिल रोजी आयोजित केली होती. 


सभापतीपदाला डावलले

नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद सभापती पदाच्या निवडणुकीसाठी खुद्द शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद पाटील यांच्या मातोश्रींना महिला व बाल कल्याण सभापती करण्याचे आदेश दिले होते. मात्र, जिल्ह्याचे आम्हीच नेते आहोत, आमच्या शिवाय पक्षाची गाडी हलवणार नाही अशा अविर्भावात असलेल्या गायकवाड व माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आनंद पाटील यांच्या मातोश्रीला सभापती पदापासून वंचित ठेवण्याचे काम केल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. 


दोन दिवसात कोल्ह उसात

जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये निवडून येताच सभापतीपद मागणे म्हणजे दोन दिवसात कोल्ह उसात या म्हणी प्रमाणे आहे. ज्या लोकांची उभी उभी हयात शिवसेनेत गेली आहे अशांना संधी देणे योग्य झाले असते. अशी प्रतिक्रिया माजी आमदार चौगुले यांच्या समर्थकांनी दिली आहे. 


 
Top