भूम (प्रतिनिधी)-  भूम तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त साडेसांगवी गावचे सरपंच सुभाष देवकते यांनी समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत एक प्रेरणादायी निर्णय घेतला आहे. माजी मंत्री तथा आमदार तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गावातील गरजू कुटुंबांना मदत करण्यासाठी महत्त्वाचा उपक्रम जाहीर केला आहे.

या उपक्रमांतर्गत साडेसांगवी गावातील कोणत्याही आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलीच्या विवाहासाठी सरपंच सुभाष देवकते स्वतःच्या वतीने पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे अडचणीत असलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून मुलींच्या विवाहासाठी आवश्यक असलेली आर्थिक मदत सहज उपलब्ध होणार आहे.

सध्या समाजात केवळ आश्वासने देणाऱ्यांची संख्या वाढत असताना प्रत्यक्ष कृतीतून समाजसेवेचे उदाहरण कमीच पाहायला मिळते. मात्र, देवकते यांनी आपल्या कृतीतून समाजसेवेचा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे गावात परस्पर सहकार्याची भावना अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.

याबाबत आपली भावना व्यक्त करताना सुभाष देवकते म्हणाले, “गावाने आपल्याला खूप काही दिले आहे. त्या ऋणातून उतराई होण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. आजही अनेक कुटुंबांना मुलीच्या विवाहावेळी आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी आपल्या लेकीच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी समाजसेवा आहे. हा उपक्रम केवळ मदत नसून प्रत्येक मुलीने सन्मानाने आणि आनंदाने नव्या आयुष्याची सुरुवात करावी हीच मनापासून इच्छा आहे.” या निर्णयामुळे साडेसांगवी गावात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत होत आहे. तसेच इतरांनीही अशा सामाजिक कार्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


 
Top