धाराशिव (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 8 एप्रिल ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत जिल्ह्यात “सामाजिक समता सप्ताह” विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.या सप्ताहाच्या निमित्ताने शासकीयस्तरावर जनजागृतीपर कार्यक्रम,शिबिरे व विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
7 एप्रिल रोजी सामाजिक समता सप्ताहाचे नियोजन व तयारी करण्यात येणार असून,8 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सकाळी 11 वाजता उद्घाटन समारंभ होणार आहे.या वेळी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आधुनिक भारत याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.
09 एप्रिल रोजी आर.पी. महाविद्यालय,धाराशिव येथे ‘स्वाधार योजना व इतर शासकीय योजनांचे लाभ’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.10 एप्रिल रोजी महिला मेळाव्याचे आयोजन सामाजिक न्याय भवन येथे सकाळी 11 वाजता करण्यात येणार असून, महिलांसाठी विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली जाणार आहे. 11 एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी व मार्गदर्शन दिले जाईल. 12 एप्रिल रोजी निवासी शाळा परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून, समाजातील स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाणार आहे.
13 एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन सामाजिक न्याय भवन येथे सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. तर 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात जयंती उत्सव,विविध स्पर्धा, सामाजिक समता रथाचे प्रबोधन तसेच विविध विषयांवरील तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार असून, सप्ताहाचा समारोप करण्यात येणार आहे. संपूर्ण सप्ताहात जिल्ह्यातील विविध शासकीय अधिकारी,कर्मचारी तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग अपेक्षित असून,सामाजिक समता व बंधुता यांचा संदेश सर्वत्र पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमांतून करण्यात येणार आहे.