भूम (प्रतिनिधी)- भूम शहर व तालुक्यातील सर्व शिवभक्तांच्या वतीने दुर्गराज रायगडावर छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. अत्यंत भक्तीभाव, आदर आणि शिवप्रेमाच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली. शिवसमाधीची नित्य पूजा करणारे तसेच वर्षभर रायगड परिसर व जगदीश्वर मंदिर परिसर स्वच्छ ठेवून सेवा बजावणाऱ्या शिवसेवकांचा विशेष सन्मान करण्यात आला. रायगड किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या आदिवासी बांधवांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. तसेच काही बांधवांना सोलार लॅम्प व पावसापासून संरक्षणासाठी ताडपत्री देऊन मदतीचा हात देण्यात आला.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समिती दुर्गराज रायगड, श्रीतुळजाई दुर्ग प्रतिष्ठान भूम तालुका आणि सर्व शिवभक्तांच्या संयुक्त माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीचा अभिवादन कार्यक्रम सामाजिक बांधिलकी जपत उत्साहात साजरा करण्यात आला.
