भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील ईट येथे भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा दि. 11 व 12 एप्रिल रोजी उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडल्या. दोन दिवस चाललेल्या या भव्य स्पर्धेत राज्यभरातून तब्बल 68 संघांनी सहभाग नोंदवून सांस्कृतिक वैभवाची झलक दाखवली.

रविवारी पार पडलेल्या कार्यक्रमास आमदार तथा माजी मंत्री डॉ. तानाजीराव सावंत, भूमचे माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, परंडाचे नगराध्यक्ष जाकिर सौदागर, जिल्हा परिषद माजी सभापती दत्ताना साळुंखे, भैरवनाथ साखर कारखान्याचे उप चेअरमन  केशव सावंत, माजी सभापती अण्णासाहेब देशमुख यांच्यासह आयोजक प्रवीण देशमुख, शंभूराजे देशमुख, बाळासाहेब हाडोंग्रीकर पाटील  व अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ईट येथे अनेक वर्षांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्याने परिसरातील तरुण-तरुणींसह महिला वर्गाने मोठी गर्दी केली. तांडव नृत्य, भारुड, भक्तीगीते, गोंधळ, लावणी, कथक, भरतनाट्यम अशा विविध नृत्यप्रकारांनी रंगमंच अक्षरशः दणाणून गेला. घुंगरांची छनछन, तबला-ढोलकीचा ठेका, संबळाचे नाद आणि रंगीबेरंगी रोषणाईमुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. रविवारी आयोजकांच्या विनंतीला मान देत आमदार तानाजीराव सावंत स्वतः उपस्थित राहिले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन पाहून समाधान व्यक्त करत त्यांनी पुढील वर्षी स्पर्धकांसाठी स्वतःच्या निधीतून 5 लाख रुपयांच्या बक्षिसांची घोषणा केली.

 

स्पर्धेचे निकाल 

समूह गट (शनिवार) प्रथम नृत्य निकेतन अकॅडमी, द्वितीय  साया अकॅडमी, तृतीय  ऑसम अकॅडमी,  वैयक्तिक गट (शनिवार) प्रथम  विराट काळे, द्वितीय  अदिती जाधव, तृतीय  शौर्य गोडबोले, समूह नृत्य (अंतिम फेरी)- प्रथम  स्कोडा 24, द्वितीय  डी टू डी, तृतीय  एंजल डान्स, एकल नृत्य (अंतिम फेरी)-प्रथम  सानिका भागवत, द्वितीय  अभी गाडगे, तृतीय  गणेश पवार.


कार्यक्रमादरम्यान ईट गावातील असून सध्या विविध ठिकाणी महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असलेल्या भूमिपुत्रांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून रोहित राठोड (मुंबई) व सिद्धी गाडेकर (शिर्डी) यांनी काम पाहिले, तर ऐश्वर्या हिबारे व हनुमान गवळी यांनी निवेदनाची जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ईश्वर देशमुख, बंटी देशमुख, आप्पा चव्हाण, पप्पू देशमुख तसेच पत्रकार बांधवांनी विशेष परिश्रम घेतले. नुकत्याच झालेल्या आकस्पीत वादळामुळे भूम तालुक्यातील ईट येथील शेतकरी सुधीर भोसले यांच्या केळीच्या भागाचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या कार्यक्रमात शेतकरी सुधीर भोसले यांना बोलवून माजी मंत्री तानाजी सावंत यांनी वैयक्तिक रित्या एक लाख रुपयांची मदत केली. तर सामनगाव येथील  मिराबाई काळे या महिलेचे घर जवळ तिचे मोठे नुकसान झाले होते. या महिलेची यावेळी पन्नास हजार रुपयाची रोख रक्कम मदत म्हणून सावंत यांनी दिली. तसेच मतदारसंघातील जनतेच्या सुखदुःखात मी सदैव सोबत असल्याचं यावेळी सांगून जनतेचे आभार व्यक्त केले. भूम परडा वाशी मतदारसंघात राज्यस्तरीय नृत्याचा कार्यक्रम प्रथमच आयोजित केल्याबद्दल या कार्यक्रमात आमदार सावंत यांनी भूम बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख व त्यांच्या टीमचे कौतुक करून त्यांना शाबासकी दिली.


 
Top