भूम (प्रतिनिधी)- विद्यार्थी व शिक्षकांमध्ये विज्ञानाप्रती संशोधक वृत्ती वाढीस लागावी आणि विज्ञान विषयात नवनवीन नवोपक्रम राबवले जावेत या उदात्त हेतूने धाराशिव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या वतीने डॉ. सी. व्ही. रमण जिल्हास्तरीय विज्ञान शिक्षक पुरस्कार 2025-26 चा वितरण सोहळा शुक्रवार, दि. 3 एप्रिल रोजी परंडा येथील बावची विद्यालय येथे अत्यंत उत्साहात पार पडला. या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांमध्ये वाशी तालुक्यातील जे. आय. आर. टी. तंत्र प्रशालेच्या सहशिक्षिका पूनम गौतम चेडे यांनी जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे. त्यांना जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान धाराशिव डायटचे प्राचार्य डॉ. दयानंद जटनुरे यांनी भूषवले. तर धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या शुभहस्ते मानकरी शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. विज्ञान विषयात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील एकूण दहा गुणवंत शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. यामध्ये प्रथम पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या. पूनम चेडे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल आणि श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल धाराशिव विज्ञान अध्यापक मंडळ आणि उपस्थित मान्यवरांकडून त्यांचे विशेष अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाप्रसंगी कळंब येथील कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूलचे संस्थापक रवी नरहिरे, बिभीषण रोडगे, सूर्यभान हाके, परंडा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर, शिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे आणि माध्यमिक व योजना शिक्षणाधिकारी नागेश मापारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले. आभार प्रदर्शन धाराशिव जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी (योजना) संतोष माळी यांनी केले. या सोहळ्याला जिल्ह्यातील आठही तालुक्यांचे विज्ञान अध्यापक मंडळाचे तालुकाध्यक्ष आणि जिल्ह्यातील विज्ञान शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
