तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापुरात चैत्री पौर्णिमा दिनी गुरुवार दि. 2 एप्रिल रोजी घडलेल्या दोन घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भाविकांची प्रचंड गर्दी असताना या घटना घडल्याने गर्दीच्या दिवशी सुरक्षा यंत्रणा अधिक कडक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पहिली घटना धाराशिव रोडवर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख आणि भाविक यांच्यात घडली. याप्रकरणी भाजपाचे काक्रंबा जिल्हा परिषद गटातील सदस्य दयानंद शिंदे हे याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी यांना भेटावयास गेले असता त्यांनी हाकलून लावल्याने संतप्त झालेल्या जिल्हा परिषद सदस्य दयानंद शिंदे यांनी पोलीस ठाण्यात जोपर्यंत आम्ही दिलेली फिर्याद दाखल होत नाही, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला जात नाही, तोपर्यंत आम्ही उठणार नसल्याचे यावेळी सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी शिंदे यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बोलताना जि. प. सदस्य शिंदे म्हणाले की, मी सत्ताधारी भाजपचा जिल्हा परिषद सदस्य आहे व पक्षाचा पदाधिकारी आहे. मला जर पोलीस ठाण्यात अशी वागणूक मिळत असेल तर काय उपयोग आहे असा सवाल केला.
पुण्यातील दोन गटात हाणामारी
तर दुसरी घटना श्री तुळजाभवानी मंदिर परिसरातील शिलंगण पारा समोर घडली. या दोन्ही घटनांमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, चैत्री पौर्णिमेच्या रात्री छबीना सोहळ्यापूर्वी दोन देवीभक्तांच्या गटात शाब्दिक वाद होऊन तो हमरी-तुमरीपर्यंत पोहोचल्याची घटना समोर आली. या प्रकरणात दोन्ही गटांनी एकमेकांवर नारळ फेकाफेकी करून मारहाण व शिवीगाळ केल्याचे आरोप केले आहेत. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून दोन्ही गटांनी आपण प्रथम हल्ला केला नसल्याचा दावा केला आहे. पुण्यात एका देवीभक्ताने बिबेवाडी येथील दुसऱ्या गटावर नारळ व भोपळे फेकून हल्ला केल्याचा आरोप केला आहे. मात्र संबंधित गटाने हे आरोप फेटाळत, “आम्ही कोणताही हल्ला केला नाही, सीसीटीव्ही फुटेज तपासून सत्य समोर आणावे,” अशी मागणी केली आहे.
