भूम (प्रतिनिधी)- भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भूम नगर परिषदेत आज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नगरपरिषद कार्यालयात बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या वेळी आलमप्रभू नगर विकास आघाडीच्या नगराध्यक्ष संयोगिता संजय गाढवे तसेच जनशक्ती शहर विकास आघाडीच्या उपनगराध्यक्ष लक्ष्मी साठे यांनी वेगवेगळ्या वेळेत नगरपरिषदेत येऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी स्वतंत्रपणे जयंती साजरी केल्यामुळे शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. महापुरुषांच्या जयंतीसारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमात सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी एकत्र येणे अपेक्षित असताना, वेगवेगळ्या वेळेत कार्यक्रम पार पडल्याने दोघांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. काही नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त करत, अशा कार्यक्रमांत सर्वांनी एकत्र येऊन एकात्मतेचा संदेश द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी नगरपरिषदेमधील सर्व नगरसेवक, स्वीकृत नगरसेवक तसेच प्रभारी मुख्याधिकारी प्रवीण जाधव आणि नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी बाबासाहेबांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले. एकूणच, कार्यक्रम साधेपणाने पार पडला असला तरी पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, भविष्यात अशा कार्यक्रमांत एकजूट दिसावी, अशी नागरिकांची अपेक्षा व्यक्त होत आहे. 


 
Top