उमरगा (प्रतिनिधी)- शहरातील राष्ट्रीय महामार्गां-लगतची जुनी झाडे धोकादायक झाली आहेत. जोरदार पाऊस, वादळी वाऱ्याने जुनाट झाडेही कोलमडून पडत आहेत. यामुळे मार्गावरील जुनी व धोकादायक असलेली झाडे हटवण्याची गरज आहे.
शहराच्या मध्य भागातून गेलेल्या या सोलापूर- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. सध्या अवकाळी जोरदार पाऊस व वाऱ्यामुळे मार्गावरील अनेक झाडे उन्मळून पडू लागली आहेत. केव्हा, कधी धोकादायक वृक्ष कधीही उखडून किंवा एखादी मोठी फांदी वाहनावर पडून जीवित व वित्तहानी होण्याचा धोका आहे. अलीकडेच जोराच्या झालेल्या पावसामुळे परिसरातील अनेक झाडे व फांद्या उन्मळून पडत आहेत. परिणामी या मार्गावरील वाहतूक खोळबंली होती. गत वर्षी रात्री शासकीय विश्रामगृहाजवळ जुनाट व मोठे झाड पडले. रस्त्याच्या लगत असलेल्या जुनाट झाडे उन्मळून पडली तर फांद्या कोसळलेल्या आहेत. संबंधित विभागाने रस्त्याच्या दुतर्फा असलेली जुनाट,धोकादायक झाडे हटविण्याची व फांद्या छाटण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
चार-पाच दिवसापूर्वी रात्री तालुक्यातील कराळीतांडा येथे विज पडून भारतबाई चव्हाण यांची म्हैस दगावली. कराळी गावात बालाजी इंगळे व गोविंद मुगळे यांच्या घराच्या सामाईक भिंतीवर विज पडून घरातील साहित्याचे नुकसान झाले. शहरातील स्वप्नील बसवराज स्वामी यांच्या घरावरील पाण्याच्या टाकीवर विज पडून टाकीसह पाईपलाईन जळाली आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
