धाराशिव (प्रतिनिधी)-  येरमाळा येथील आई येडेश्वरी यात्रेनिमित्त दरवर्षी लाखो भाविक उपस्थित राहतात. यावर्षीही मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने धुळेसोलापूर महामार्गावर सुमारे 40 किलोमीटरपर्यंत भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली. या कोंडीमुळे अनेक वाहनचालकांना तब्बल चार ते आठ तास रस्त्यात अडकून राहावे लागले. यामध्ये रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवांनाही मोठा अडथळा निर्माण झाला, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. ही गंभीर परिस्थिती योग्य नियोजनाच्या अभावामुळे निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. भविष्यात अशा प्रकारची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केले आहे.

यासंदर्भात त्यांनी धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले असून त्यामध्ये काही महत्त्वाच्या उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. यात्रेच्या काळात पर्यायी मार्ग निश्चित करून त्याची पूर्वसूचना नागरिकांना देणे आवश्यक आहे. तसेच मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचे सुयोग्य नियोजन करून वाहतूक पोलिसांची संख्या वाढवावी, अशी मागणी डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केली आहे. 

 
Top