धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आळणी यांचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा परिषद धाराशिवच्या अध्यक्ष अर्चनाताई राणाजगजीतसिंह पाटील उपस्थित होत्या.
तसेच विशेष अतिथी म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. रवींद्र खंदारे, गटशिक्षणाधिकारी सय्यद असरार, जेष्ठ विस्तार अधिकारी श्री. जंगम, येडशी बीटचे विस्तार अधिकारी प्रकाश पारवे, विस्तार अधिकारी चौरे, सौ. उषाताई सर्जे, आळणी गावचे सरपंच प्रमोद काका वीर, उपसरपंच कृष्णा गाडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. संजीवनी बाबासाहेब पौळ, उपाध्यक्षा सौ. अफसाना सलीम शेख, केंद्रप्रमुख महेश अनपट, पोलीस पाटील प्रमोद माळी, माजी शिक्षण विस्तार अधिकारी मोकाशी, लिटल स्टार शाळेचे दिवाणे सर, तसेच शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष इतबारे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर एमबीबीएस डॉक्टर झाल्याबद्दल डॉ. दिव्या प्रशांत पापा वीर तसेच नवोदय विद्यालयासाठी निवड झाल्याबद्दल विद्यार्थिनी श्रद्धा गणेश निंबाळकर हिचा विशेष सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. बशीर तांबोळी यांनी केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सौ. अर्चनाताई पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत सेमी इंग्रजी शिक्षण, सायंकाळी 7 ते 9 या वेळेत टीव्ही बंद ठेवण्याची सवय, आरोग्य व शिक्षण यांचे महत्त्व अधोरेखित केले व विविध शासकीय योजनांची माहिती दिली. शिक्षणाधिकारी डॉ. खंदारे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलनाचे महत्त्व पटवून देत शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. स्वागतगीत, गणेश वंदना, खंडोबा गीत, गोरोबा कुंभार जीवनचरित्र, कोळीगीत, विनोदी नृत्य, लावणी, भारूड, मंगळागौर, दांडिया, नारीशक्ती, मराठा सैन्य, शिवकन्या, तसेच विविध हिंदी व मराठी गाण्यांवरील नृत्याविष्कारांनी कार्यक्रम रंगतदार झाला. काठी न घोंगड, फुलवंती, नवराई माझी लाडाची, कृष्ण मुरारी, खानदेशी ठेका यांसारख्या गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन विशाल सूर्यवंशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन हनुमंत माने यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. एकूणच, आळणी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साह, आनंद आणि सांस्कृतिक वैभवाने परिपूर्ण असे संस्मरणीय ठरले.
