धाराशिव (प्रतिनिधी)- गरजूंसाठी मोफत व सुलभ न्याय मिळवून देणे हेच विधी सेवा प्राधिकरणाचे ध्येय असल्याचे प्रतिपादन विधी व सेवा प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री पाटील यांनी केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष,संत गाडगे महाराज जयंतीचे 150 वे वर्ष तसेच महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन 8 ते 14 एप्रिल 2026 दरम्यान करण्यात आले आहे. या कालावधीत जिल्ह्यात “सामाजिक समता सप्ताह” अंतर्गत शासकीय स्तरावर जनजागृतीपर कार्यक्रम, शिबिरे व विविध विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत.
दि. 9 एप्रिल रोजी येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन कवले,समाज कल्याण अधिकारी सनम लामकाने तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदीप देशमुख हे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयातील पायल अतुल नन्नावरे, आदित्य दीपक कदम, स्वप्नील माने, वैष्णवी बीडबाग, निशा खुडे आणि सुमीत सावंत या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेअंतर्गत तसेच भारत सरकारच्या इतर शिष्यवृत्ती योजनांद्वारे प्रत्येकी 45 हजार रुपयांच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. हे धनादेश भाग्यश्री पाटील व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन कवले यांचेही मार्गदर्शन झाले. या कार्यक्रमास विद्यार्थी, पत्रकार बांधव तसेच अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समाज कल्याण निरीक्षक अतुल जगताप, अतुल मुक्ते तसेच लिपिक संकेत जगताप व संकेत भोसले यांनी व परिश्रम घेतले.
