तुळजापूर (प्रतिनिधी)- इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या इंधन टंचाईचा परिणाम आता ग्रामीण भागात दिसू लागला असून, पारंपरिक मातीच्या चुलींना पुन्हा चांगले दिवस आले आहेत. तुळजापूर परिसरात चुलींची मागणी झपाट्याने वाढत असून कुंभार सध्या चुली तयार करण्यात व्यस्त आहेत.
पूर्वी रॉकेल स्टोव्ह, त्यानंतर गॅस शेगड्यांचा वापर वाढला होता. मात्र सध्या इंधनाचा प्रश्न निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील नागरिक पुन्हा पारंपरिक चुलीकडे वळताना दिसत आहेत. स्थानिक बाजारात दर आठवड्याला 100 ते 150 चुलींची विक्री होत असल्याची माहिती कुंभारांनी दिली. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मागणी असून शहरी भागातही काही प्रमाणात चुली खरेदी केल्या जात आहेत. सध्या एका मातीच्या चुलीची किंमत सुमारे 200 रुपये असून नागरिक मोठ्या उत्साहाने खरेदी करत आहेत. चुलीवर बनवलेल्या जेवणाच्या चवीमुळेही लोकांचा कल वाढला आहे.
चुली तयार करण्यासाठी पंढरपूर परिसरातून विशेष माती आणली जाते. त्यानंतर कच्च्या चुली तयार केल्या जातात. त्या वाळवून भट्टीत भाजल्या जातात
ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारण 7 ते 8 दिवसांचा कालावधी लागतो. सध्या कुंभारांच्या घराकडे नागरिकांची मोठी वर्दळ वाढली असून चुली खरेदीसाठी लोकांची पावले वळत आहेत. इंधनाच्या समस्येमुळे पुन्हा एकदा पारंपरिक चुलींचा वापर वाढताना दिसत असून ग्रामीण भागात चुलीवरील स्वयंपाकाचा आस्वाद घेण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे.
