कळंब (प्रतिनिधी)- कळंब बसस्थानकात मंगळवारी सायंकाळी सुमारे 6:15 वाजण्याच्या सुमारास अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. कळंब ते धाराशिव मार्गावरील (बस क्र.2095) एसटी बस चालकाविनाच अचानक मागे सरकू लागल्याने काही काळ बसस्थानकात एकच खळबळ उडाली. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बस प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर उभी होती. बसची नोंदणी करण्यासाठी चालक वाहतूक नियंत्रक कक्षात गेले असताना अचानक बस मागे सरकू लागली. त्या वेळी लग्नसराईमुळे बस प्रवाशांनी खचाखच भरलेली होती. बस हालचाल करत असल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी जोरात आरडाओरड सुरू केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत चालकाने तात्काळ धाव घेत बसमध्ये प्रवेश करून बस थांबवली. या धाडसी कृतीमुळे संभाव्य अपघात टळला, अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, कळंब आगारातील अनेक बस नादुरुस्त अवस्थेत असल्याची तक्रार प्रवाशांकडून वारंवार केली जात आहे. बसची योग्य दुरुस्ती न केल्यामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. “बस वाटेतच बंद पडणे, ब्रेक फेल होण्याचे प्रकार वाढले असून प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे,“ अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या घटनेमुळे एसटी महामंडळाच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.