धाराशिव (प्रतिनिधी)- परळी ते अक्कलकोट या राज्य मार्गावरील पाडोळी (आ) ते टाकळी या रस्त्याची अत्यंत खराब झालेली अवस्था लक्षात घेऊन तात्काळ दुरुस्ती व मजबुतीकरण करण्याची मागणी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य अँड. व्यंकट गुंड यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडेही याबाबत निवेदन सादर करण्यात आले आहे.
सदर निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, धाराशिव तालुक्यातील पाडोळी (आ) ते टाकळी हा रस्ता मागील दोन वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत असून हा मार्ग दोन मोठ्या गावांना तसेच जिल्ह्याशी जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच या मार्गावरील एस.टी. बस सेवा देखील बंद करण्यात आल्याने नागरिक, विद्यार्थी व शेतकरी यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडथळे निर्माण होत असून त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. याशिवाय ऊस वाहतुकीसाठी जड वाहनांची सततची ये-जा होत असल्यामुळे रस्त्याची अधिकच दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात चिखलामुळे या मार्गावरून प्रवास करणे अत्यंत कठीण बनते, तसेच अपघातांचे प्रमाणही वाढले असून अनेकांना अपघातात दुखापत व अपंगत्व आले आहे. या सर्व बाबींचा विचार करून पावसाळ्यापूर्वी संबंधित रस्त्याची तात्काळ पाहणी करून दुरुस्ती व मजबुतीकरणाचे काम हाती घ्यावे, तसेच शाळा सुरू होण्यापूर्वी हा रस्ता सुस्थितीत करावा, अशी मागणी अँड. व्यंकट गुंड यांनी केली आहे.