तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथील पंचायत समितीच्या पुढाकारातून काटगाव गणात आयोजित करण्यात आलेला जनता दरबार हा प्रश्न सोडवण्याऐवजी वादाचा विषय ठरला आहे. सभापतींच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या दरबारात ग्रामस्थांनी तक्रारींचा अक्षरशः पाऊस पाडला. मात्र तक्रारीचे समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पंचायत समिती सभापती विक्रमसिंह देशमुख, जिल्हा परिषद सदस्य निवृत्ती माळी, बालाजी शिंदे, विजय शिंगाडे, पंडित जोकार, वसंत वाडगावे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ग्रामस्थांनी पाणी, घरकुल, शेती, जलसंधारण अशा विविध विषयांवर प्रश्न उपस्थित केले. मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने
“जनता दरबार फक्त नावालाच आहे का?” असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला. केंद्र व राज्य स्तरावर महिला सन्मान, महिला प्रतिनिधित्व यावर भर दिला जात असताना, निवडून आलेल्या महिला पंचायत समिती सदस्यां भाग्यश्री नागनाथ शिंदे यांच्या गैरहजेरीचा मुद्दा चर्चेत आला. यामुळे “महिलांना संधी देऊनही त्या उपस्थित राहत नसतील, तर ग्रामस्थांच्या प्रश्नांना न्याय मिळणार कसा?” अशी टीका होत आहे. दरबारात अन्यायग्रस्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराचा पाढाच वाचला.
