तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील नागरी सुविधा अधिक सुलभ व लोकाभिमुख करण्यासाठी तुळजापूर नगर परिषदेकडून ‌‘नगर परिषद आपल्या दारी‌’ हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी दिली. या उपक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रलंबित नागरी समस्या सोडविण्यासाठी तसेच विकासकामांना गती देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात येत आहे. प्रभागनिहाय समित्या गठीत करून नागरिकांच्या थेट सहभागातून समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

नगर परिषदेकडून विविध शासकीय योजनांचे प्रमाणपत्र, सुविधा व सेवा नागरिकांना त्यांच्या प्रभागातच उपलब्ध करून देण्याचा उद्देश असून, यासाठी नागरिकांनी बैठकीत उपस्थित राहून आपले प्रश्न व सूचना मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे तसेच गटनेते औदुंबर कदम यांनीही नागरिकांना सहभागाचे आवाहन केले आहे.

 प्रभागनिहाय बैठकीचे वेळापत्रक

दि. 16 एप्रिल 2026 : प्रभाग क्रमांक 1 ते 4, दि. 17 एप्रिल 2026 : प्रभाग क्रमांक 5 ते 8, दि. 18 एप्रिल 2026 : प्रभाग क्रमांक 9 ते 11,  ठिकाण द स्कायलंड हॉटेल या बैठकीत प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, पथदिवे यांसारख्या  नागरी मूलभूत सुविधांबरोबरच शहर विकास आराखडा व श्री तुळजाभवानी मंदिर परिसराच्या विकासाबाबतही नागरिकांकडून सूचना घेतल्या जाणार आहेत. इच्छुक नागरिकांना समितीत सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे.


नागरिकांनाही विकासात सहभाग

शहरातील विकासकामे अधिक दर्जेदार व जलद गतीने पूर्ण व्हावीत, यासाठी सामान्य नागरिकांनाही थेट सहभागाची संधी देण्यात येत आहे. प्रभागनिहाय समस्या सोडविण्याबरोबरच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


 
Top