धाराशिव (प्रतिनिधी)- रोटरी क्लब धाराशिव येथे जिल्हा राज्यपाल सुधीर लातूरे यांचा अधिकृत दौरा उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. या दौऱ्यादरम्यान शिक्षण, सार्वजनिक प्रतिमा, समाजसेवा व रोटरीच्या विविध उपक्रमांचा सखोल आढावा घेण्यात आला.
दौऱ्याची सुरुवात धाराशिव येथील ए. पी. प्राथमिक शाळा येथे भेट देऊन करण्यात आली. सदर शाळा रोटरी क्लब धाराशिवने Happy School म्हणून दत्तक घेतली असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा उभारणी, शैक्षणिक साहित्य वितरण, स्वच्छता व गुणवत्तावृद्धी अशा विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा राज्यपालांनी शाळेतील सुविधांची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला व क्लबच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
यानंतर धुळेसोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रोटरी क्लब धाराशिवतर्फे उभारण्यात आलेल्या रोटरी ब्रँडिंग बोर्डाचे उद्घाटन जिल्हा राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे रोटरीच्या सेवाभावी कार्याची व्यापक ओळख समाजापर्यंत पोहोचणार असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढे वसुदेव वस्ती, उंबरे कोठा (धाराशिव) येथील पलावरची शाळा येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना व्यवसाय गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच समाजातील कर्तृत्ववान व्यक्ती, पत्रकार बंधू-भगिनी तसेच नव्याने रोटरी परिवारात सहभागी झालेल्या सदस्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सुधीर लातूरे यांनी रोटरीचा मूलमंत्र “Service Above Self” अधोरेखित करत, निःस्वार्थ सेवाभावातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचे आवाहन केले. त्यांनी क्लबच्या विविध उपक्रमांचे कौतुक करत आगामी काळात अधिक व्यापक व परिणामकारक प्रकल्प राबवण्याचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये डिस्ट्रिक्ट तर्फे दिला जाणारा आत्मनिर्भर पुरस्कार युवा उद्योजक अनिल सावंत व डिस्ट्रिक्ट तर्फे रोटरी सुरक्षा पुरस्कार हा अपंगत्व असलेल्या योगदानाबद्दल मयूर काकडे यांना देण्यात आला.
तसेच समाजातील विविध लोकांना वोकेशनल अवार्ड ने सन्मानित करण्यात आले या मध्ये पांडुरंग घोडके, पोपट कसबे आशा कार्यकर्त्या सिमा थोरात,बेलुरे, यांचा समावेश होतो. कार्यक्रमादरम्यान क्लब अध्यक्ष रोटे. रणजीत रांदिवे यांनी अध्यक्षीय भाषणातून क्लबच्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा मांडला, तर सचिव रोटे. प्रदीप खमकर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. या कार्यक्रमास फर्स्ट लेडी रोटे. संगीता सुधीर लातुरे मॅडम, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रोटे. टापडिया, असिस्टंट गव्हर्नर डॉ. गिरीश कुलकर्णी व सौ. कुलकर्णी मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच क्लबचे सर्व संचालक मंडळ, सदस्य व रोटेरियन मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा दौरा रोटरी क्लब धाराशिवसाठी प्रेरणादायी ठरला असून, समाजहिताच्या विविध उपक्रमांद्वारे रोटरीची सेवा अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
