मुरूम (प्रतिनिधी)- राजकारणात कोणताही पक्ष हा कार्यकर्त्यांशिवाय मोठा होऊ शकत नाही. कार्यकर्ता हा पक्षाचा मुख्य कणा असतो आणि याच कार्यकर्त्यांच्या निष्ठेच्या व कष्टाच्या आधारावर आज भारतीय जनता पक्षाने राज्यात व देशात सत्ता मिळवली आहे. भाजप आज जगातील सर्वाधिक बलाढ्य पक्ष म्हणून नावारूपास आला आहे, त्याचे सर्व श्रेय तळागाळातील कार्यकर्त्यांना जाते. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा भाजपचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले.
बुधवारी (ता. 2) रोजी मुरूम येथील विठ्ठल मंदिरात उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक आढावा बैठक व बूथ कमिटी चर्चासत्र उत्साहात पार पडली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनेची बांधणी अधिक मजबूत करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना पाटील यांनी प्रत्येक गावातील वॉर्डनिहाय बूथ कमिटी प्रमुखांनी आपली जबाबदारी ओळखून कार्य करावे, अशा सूचनाही दिल्या.
या महत्त्वपूर्ण बैठकीला मंचावर मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते समितीचे सह अध्यक्ष शरण बसवराज पाटील, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेराव, मदन पाटील, योगेश राठोड, भरत मारेकर, प्रा. शौकत पटेल, उमेश बारकुले यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच उमरगा पंचायत समितीचे सदस्य अमर वाले संजय मुळे लोहारा पंचायत समितीचे सदस्य दत्तात्रय वाघमारे,नागनाथ पाटील, व स्वप्नील कारभारी यांच्यासह कारखान्याचे संचालक शिवालिंग माळी लोहारा भाजप अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष रब्बानी नबेगावे, सतिश पवार आणि आलूरचे सरपंच राम जेऊरे, राजू मुल्ला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राचार्य उल्हास घुरघुरे तर आभार गटनेते गणेश अंबर यांनी मानले.
